Thursday, August 9, 2007

मात्र रात्र

गेल्या महिन्यात मात्र रात्र चा प्रयोग सुदर्शन रंगमंच, पुणे येथे सादर झाला होता, तेव्हापासून हे नाटक पाहायची खूप इच्छा होती. आणि काल म्हणजे ८ ऑगस्ट ला तो योग जुळून आला. आधीचे प्रयोग हाउसफूल्ल झाल्यामुळे तिकीट मिळेल की नाही याची धाकधूक मनात होतीच. त्यामुळे मी सुदर्शन पाशी थोड्या लवकरच पोहोचलो आणि सुदैवाने तिकीट मिळाले.
यापूर्वी मोहित टाकळकरचं "फ्रीज मध्ये ठेवलेले प्रेम" पाहिलं होतं. त्यामुळे एक दमदार नाट्यप्रयोग पाहायला मिळेल याची खात्री होती. नाट्यप्रयोग ठीक साडे सात वाजता चालू झाला आणि तिथून पुढे सव्वा तास सर्वच प्रेक्षक एका वेगळ्या जगात होते. एका शब्दात नाटकाबद्दल सांगायचं तर निव्वळ अप्रतिम.


नाटकाचं कथानक निलू आणि अंजू या तरुण जोडप्याभोवती फिरतं. सागर देशमुख आणि राधिका आपटे या कलाकारांनी या भूमिका एवढ्या सहजतेने पार पाडल्यात की त्याला तोड नाही. मानवी स्वभावाच्या विविध छटा, पती-पत्नी यांमधील संवेदनशील नातं, त्यांच्यामधलं प्रेम तर कधी कधी त्यांच्यात होणारा संघर्ष, भावनिक गुंतागुंत आणि नात्यातील चढउतार सर्वकाही प्रेक्षकांसमॊर मांडण्यात हे नाटक यशस्वी होतं. नाटकामध्ये विशेष काही घडत नसलं तरीही उत्कृष्ट सादरीकरण आणि खुसखुशीत संवाद यामुळे नाटक चालू झाल्यापासून संपेपर्यंत प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो, आणि यातच नाटकाचं सर्वात मोठं यश आहे. नाटकाची मूळ कथा इंग्रजी असून त्याचं मराठीत नाट्यरुपांतर करण्याची कामगिरी सागर देशमुख याने चोख पार पाडली आहे. मोहित टाकळकरचं दिग्दर्शन सफाईदार. तर प्रदीप वैद्य ची अप्रतिम प्रकाशयोजना नाटकाला एक वेगळ्याच उंची वर नेऊन ठेवते.

निखळ मनोरंजनाची अपेक्षा असेल तर न चुकता पाहावं असं आहे हे नाटक.